Type Here to Get Search Results !

बोधकथा:- निर्मळता

 



आजची बोधकथा

  निर्मळता


गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येऊन पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेऊन येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरूंसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरूंकडे गेला आणि म्हणाला,"गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल." गुरुजी म्हणाले," अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर." शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरूंनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरूंनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरूंसाठी घेऊन आला. गुरूंनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,"वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झऱ्यातील पाणी शांत होण्याची प्रतिक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेऊ नये."


तात्पर्य :- भावनेच्‍या भरात कोणतेही निर्णय घेऊ नयेत. मनात कायम स्वच्छ चांगले विचार कधी येतील हेच पहावे.

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. गोष्टी खूपच छान आहेत.खरोखर सकारात्मक उर्जा देणाऱ्या आहेत . मला तुमच्या सर्व गोष्टी आवडल्या.

    उत्तर द्याहटवा
  2. बोध कथा फार आनंदी जिवन जगण्यास चांगल्या आहेत.मला तुमच्या सर्व गोष्टी आवडल्या.

    उत्तर द्याहटवा