तेजस्वी होऊया
मराठी बोधकथा
खूप प्राचीन काळी गोष्ट आहे. त्या काळात राजे हरणांची शिकार करण्यात भूषण मानीत. अर्थात त्या काळातली परिस्थिती आजच्यापेक्षा खूप वेगळी होती. हरणांची संख्या भरपूर होती. प्रजेच्या शेतीची राजा काळजी घेई. शेतीमधील पिकांची नासाडी हरणे करीत, त्यामुळे हरणांची शिकार करणे गैर समजले जात नसे. त्यावेळची ही गोष्ट आहे. आज हरणे संख्येने खूप कमी झाली आहेत. अशावेळी आहेत ती हरणे जपणे, त्यांच्या संख्येत वाढ होईल असे प्रयत्न करणे आवश्यक आहे. जर कुणी हरणांना इजा पोहचवेल तर त्याला शासन होणेही गरजेचे आहे. जोपासना व संवर्धन याची प्राणीमात्रांना गरज असल्याचा आजचा काळ आहे. हे आपण सगळे जाणतो.
पौरव कुळातला पराक्रमी राजा दुष्यंत शिकार करत कण्व मुनींच्या आश्रमात येऊन पोहोचला. आश्रमाचा परिसर रम्य होता. हरणे आणि त्यांची बालके निर्भयपणे हिंडत होती. अनेक वृक्षवेलींनी मारे वातावरण सुंदर झाले होते. फुलामुळे रंग आणि गंधाची उपळण होत होती. फळांचे मधुर गंध हवेत दरवळत होते.
हरणाचा पाठलाग करीत आलेल्या राजा दुष्यंताने शिकार करण्यासाठी धनुष्यावर भात्यातला बाण लावून नेम धरला. इतक्यात एक तेजस्वी कुमार तिथे धावत आला. राजाला त्याने अडवले. दोन्ही हात जोडून नमस्वरात कुमार म्हणाला - आश्रममृगो अयम्, न हन्तव्यो न हन्तव्यो । (राजन् हा आश्रमामधील मृग आहे. त्याला मारु नका.)
कुमाराचे ते बोल ऐकून राजा धबकला. धनुष्याच्या दोरीला लावलेला बाण त्याने परत आपल्या भात्यामध्ये घातला, हरिण दूर पळून गेले. आश्रमातला एक धीट कुमार प्रत्यक्ष सर्वसत्ताधीश आणि महाबलाढ्य राजाला विरोध करु शकला आणि राजाने त्याच्या विरोधाचा स्विकार केला ही आहे भारतीय संस्कृती.
आपल्याला जे योग्य अथवा अयोग्य वाटते ते निर्भीडपणे, स्पष्टपणे सांगता आले पाहिजे. आपण लहान आहोत, अजाण आहोत मोठ्यांना आपले सांगणे आवडणार नाही म्हणून आपले विचार व्यक्त न करणे चुकीचे आहे. आपले म्हणणे नम्रपणे पण ठामपणे सांगता येणे हा तेजस्वीपणा आहे.
