योग्य न्याय
बोधकथा
कुंदनलाल आणि जमनालाल हे दोन जवळचे मित्र होते. अनेक वर्षे त्यांनी मैत्री जपली होती. दोघेही एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होत असत. एकदा दुर्दैवाने कुंदनलाल एका प्रकरणात सापडला. त्याच्यावर खटला भरला गेला. जमनालालने धावपळ करुन वकील दिला. कोर्टात केस चालली. वकिलाने हिरिरीने कुंदनलालची बाजू मांडली. परंतु खटल्याच्या काळात न्यायाधिशांचा कल काय तो समजत नव्हता. सर्व ऐकूनही कुंदनलालला शिक्षा झाली? तर या कल्पनेनेच जमनालाल अस्वस्थ झाला. वकिलाने समजावून सांगितले की आपण बाजू योग्य मांडली आहे व प्रतिवादोंकडे पुरेसा पुरावाही नाही. तरीही जमनालाल अस्वस्थ होता. अखेर त्याने कोणाची तरी ओळख काढून न्यायाधिशांची खाजगी भेट घेऊन विनंती केली की, "कुंदनलालला कमीत कमी शिक्षा द्या." आणि झालेही तसेच, फक्त सहा महिन्यांची शिक्षा झाली. तेव्हा वकिलाला मात्र आश्चर्य वाटले. त्याने चौकशी केल्यावर न्यायाधिश म्हणाले, "खरंतर पुराव्याअभावी मी त्याला सोडून देणार होतो. पण जेव्हा त्याचा मित्रच म्हणला की कमीत कमी शिक्षा द्या, त्याअर्थी काहीतरी गुन्हा पडला असणारच, हे लक्षात घेऊन मी कमीत कमी शिक्षा सुनावली.
तात्पर्य : काहीवेळा आगंतुक मदत घातक ठरते.
